
इस्लामाबाद - पाकिस्तानातील एका गावात विमान कोसळून १२७ प्रवासी मृत्युमुखी पडले. रावळपिंडी हवाईतळाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. वाईट हवामानामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. विमान इस्लामाबादहून कराचीकडे जात होते. मृतांत ११८ प्रवाशांसह ९ नवजात अर्भके व चालक दलाच्या ९ कर्मचा-यांचा समावेश आहे.
भोजा एअरलाइनच्या बी-४२१३ विमानाने सायंकाळी पाच वाजता कराचीहून इस्लामाबादसाठी उड्डाण केले. विमान ६ वाजून ४० मिनिटांनी इस्लामाबादेत उतरणार होते. कंट्रोल टॉवरहून विमानाला लँड होण्यासाठी संकेतही देण्यात आला होता. मात्र ऐन वेळी संपर्क तुटून ते हुसैन आबाद गावात कोसळले. यात दहा ते बारा इमारती ढासळल्याची माहिती पोलिस अधिकारी सैफुर रेहमान यांनी दिली. वीज कोसळल्याने आकाशातच विमानाला आग लागल्याचे चॅनेल्सने म्हटले आहे. इस्लामाबाद हायवेपासून हुसैन आबाद गाव तीन किमीवर आहे. खराब वातावरणामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
|