
भिवंडी/मालेगाव - भिवंडी व मालेगाव महापालिकेत काँग्रेस पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भिवंडीतील ९० जागांपैकी सर्वाधिक २६ जागा जिंकत काँग्रेस पक्ष उदयास आला आहे. काँग्रेसने २६ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने १८, भाजपने ८ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागा पटकावल्या आहेत. समाजवादी पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. भिवंडीत मनसेला आपले खाते खोलता आले नाही. भिवंडीत इतर पक्षांनी १४ जागा जिंकल्या.
सत्ता कोण मिळवणार?- भिवंडी महापालिकेत सध्या तरी त्रिशंकू अवस्था दिसून येत आहे. १५ जागा जिंकणारा सपा काय भूमिका घेतो यावर येथील सत्तेचे गणित अवलंबून आहे. रविवारी भिवंडीत ९० जागांसाठी सर्वाधिक कमी म्हणजे ५२ टक्के मतदान झाले होते.
मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास सत्ता?
मालेगाव- मालेगाव महानगरपालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आहे. काँग्रेसने ८० जागांपैकी २५ जागा जिंकल्या आहेत. मालेगावात तिसरा महाज या पक्षाने १९ जागा जिंकल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ८, शिवसेना १२, तर मनसेने २ जागा जिंकल्या आहेत.
अपेक्षेप्रमाणे भाजप खाते खोलू शकला नाही. इतर स्थानिक पक्षांनी व अपक्षांनी १४ जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान, मालेगावात काँग्रेस (२५) व राष्ट्रवादीने (८) एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्यांची संख्या ३३ होते. इतर छोट्या पक्षांच्या मदतीने बहुमताचा ४१ आकडा गाठण्याचा दोन्ही पक्षाला विश्वास आहे. त्यानुसार ते एकत्र आल्यास मालेगावात काँग्रेसचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर होऊ शकतो.
|