
नवी दिल्ली: अखेर गॅस, डिझेल आणि केरोसीनची दरवाढ शुक्रवारी जाहीर करण्यात आली. गॅस ५० रुपयांनी, तर डिझेल ३ आणि केरोसिन २ रुपयांनी महाग झाले आहे. महाग सिलिंडरच्या रूपात आता
थेट स्वयंपाकघरात घुसली असून, घरोघरीचे बजेट कोलमडणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाची शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. तीत इंधन दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दरवाढ मध्यरात्रीपासून अमलातही आली आहे. सध्या तेल कंपन्यांना एक लिटर डिझेलमागे १५ रुपये, एक लिटर केरोसीनमागे २७ रुपये आणि एका गॅस सिलिंडरमागे ३८१ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या दरवाढीमुळे सरकारी तिजोरीवरचा ६७०० कोटी रुपयांचा भार हलका होणार आहे; पण आता सर्वसामान्यांवर मोठा भार पडणार आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल दरवाढ झाल्यावर गॅस, डिझेल आणि केरोसिनची दरवाढ होणार हे स्पष्ट झाले होते. फक्त मुहूर्ताचीच वाट पाहिली जात होती. शुक्रवारी तो मुहूर्त लागला. तेल कंपन्यांना होणारा तोटा रोखण्यासाठी ही दरवाढ केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मंत्रिगटाने पेट्रोलियम पदार्थांवरील सीमाशुल्क आणि अबकारी शुल्क कमी करण्याचीही घोषणा केली. त्याचा वर्षभरात सरकारला २६ हजार कोटींचा फटका बसणार आहे.
डिझेल दरवाढीचा मोठा फटका
डिझेल दरवाढीचा दुहेरी फटका बसणार आहे. डिझेलच्या गाड्या बाळगणा-यांना खिसा मोकळा करावा लागणार आहे. तसेच मालवाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार आहे.
जनक्षोभ भडकण्याचा धोका
दरवाढीमुळे आता जनक्षोभाचा भडका उडण्याची शक्यता आहे. विरोधकांना संसद अधिवेशनाच्या तोंडावर हा विषय मिळाला आहे. सरकारसमोर ते संकट उभे असताना यूपीएच्या घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसने या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, आपला पक्ष या दरवाढीचे मुळीच समर्थन करीत नाही, असे जाहीर केले आहे.
|