
नवीदिल्ली- मुंबईत वानखेडे मैदानावर होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्या दरम्यान दहशतवादी हल्लाचा धोका असल्याची माहिती गुप्तचर खात्याने महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई पोलिसांना दिली आहे. दोन एप्रिल रोजी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतीम सामना वानखेडे मैदानावर होणार असून यावेळी हा हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे.
वानखेडेवरील अंतीम सामन्याची जवळपास १७ तिकीटे जमात-ए- एहले सन्नत आणि लष्कर-ए- तोयबा संघटनेने खरेदी केल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याच्यावेळी मुंबई पोलिसांनी मैदानावर कडोकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी अशा सूचना दिल्या आहेत. मुंबई पोलिसांनीही तातडीने शहरातील तसेच मैदानावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
बांगलादेश आणि भारतात होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धांदरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. आता गुप्तचर यंत्रणांकडून ही हल्ल्यांचा धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानेही भारतीय दूतावासाला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती दिली होती.
|