
मुंबई - मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीवरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी व सत्ताधारी सदस्यांनीही गुरुवारी विधानसभेचे कामकाज बंद पाडल्यामुळे अखेर आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे लागले. विधानसभेत आज तशी त्यांनी घोषणा करताच सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.
विधानसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांना भेटायला जाणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीचा प्रश्न विचारला होता. त्यावर गृहमंत्री पाटील यांनी या प्रकरणाचा स्वतः न्यायालय तपास करीत आहे व विशेष पोलिस निरीक्षकांच्या अहवालानुसार काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असे उत्तर देऊन हा प्रश्न संपविण्याचा प्रयत्न केला. त्यातच जाधव यांच्या
वर्तनावरही गृहमंत्र्यांनी टीका करून पोलिस कारवाईचे अप्रत्यक्ष समर्थन केल्याने विरोधक संतप्त झाले व त्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. त्यातच आमदाराला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मागणी लावून धरल्याने व कामकाज रोखून धरल्याने दुपारनंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले होते.
या प्रकरणी विरोधी व सत्ताधारी सदस्य आक्रमक होते. त्यांनी नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदाराला मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह धरला. विरोधकांच्या बाजूने सत्ताधारी आमदारही गेल्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या वादावर तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात गृहमंत्री पाटील, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, शेकापचे नेते गणपतपाव देशमुख व अपक्ष आमदार दिलीप सोपल यांचा समावेश होता.
आज सकाळी या समितीची बैठक झाली. बैठकीत आमदार जाधव यांच्याबरोबरच पोलिस अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. बैठकीत बराच खल झाल्यानंतर जाधव यांना मारहाण प्रकरणी जबाबदार असणारे पोलिस निरीक्षक अभिमन्यू पवार व पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निलंबित करण्याचे ठरले. गृहमंत्री पाटील यांनी नंतर सभागृहात या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस अधिकारी पालोदे यांची नव्याने चौकशी करण्याची पोलिस महानिरीक्षकांना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.
आमदार जाधव यांची दिलगिरी
पोलिसांनी मारहाण केल्याने संतप्त झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री पाटील यांच्यावर टीका केली होती. मात्र आज गृहमंत्र्यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केल्यानंतर जाधव यांनी आपण अनवधानाने काल काही चुकीचे बोललो, त्याबद्दल सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.
अध्यक्षांचा आमदारांना सल्ला
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी, या वादावर पडदा पडला आणि कामकाज सुरळीत सुरू झाले, त्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु त्यांनी आमदारांना जसा आत्मसन्मान असतो, तसा प्रत्येकाला असतो, पोलिस अधिकाऱ्यांनाही असतो, त्यातून असे प्रश्न निर्माण होतात, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अशा प्रश्नांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही कायद्याचे बंधन असते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला.