
नवी दिल्ली-संयुक्त पुरोगामी (युपीए) सरकारने २००८ साली विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी खासदारांना पैसे दिल्याचे विकीलिक्सचे सर्व आरोप पंतप्रधानांनी शुक्रवारी संसदेत फेटाळले.सकाळी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी संसदेत केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी सव्वाबारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले ,तर राज्यसभेचे कामकाज दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विकीलिक्स प्रकरणी पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करणा-या विरोधकांनी सलग दुस-या दिवशी संसदेत गोंधळ घातला. पंतप्रधान शुक्रवारी दुपारी दोन वाजता लोकसभेत याबाबत निवेदन देतील असे सांसदीय व्यवहारमंत्री पी के बन्सल यांनी जाहीर करुन विरोधकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.परंतू या घोषणेमुळे विरोधकांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी गोंधळ चालूच ठेवला.यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.
विकीलिक्सच्या या आरोपांमुळे देशाची प्रतिमा डागाळली असल्याचे सांगत विरोधकांनी दोन्हीही सभागृहांमध्ये गदारोळ केला.
दुपारी दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यावर पंतप्रधानांनी विकीलिक्सने युपीए सरकारवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.कॉंग्रेस पक्ष किंवा सरकारमधील कोणत्याही सदस्याने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सिंग यांनी सभागृहाला सांगितले.जनतेने युपीए सरकारवरील या आरोपांना याआधीच नाकारले असताना विरोधी पक्षांनी मात्र या आरोपांना उचलून धरले ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याचे सिंग म्हणाले.१४ व्या लोकसभेच्या समितीने या संदर्भात चौकशी करुन युपीए सरकारवरील आरोप सिद्ध करण्यास कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचा निष्कर्ष काढला होता असे सिंग यांनी यावेळी सांगितले.
विकीलिक्सने यासंदर्भात पुरवलेली माहिती तथ्यहीन आणि अविश्वासार्ह असल्याचेही सिंग म्हणाले.पंतप्रधानांनी राज्यसभेतसुद्धा हेच निवेदन सादर केले.पंतप्रधानांच्या या निवेदनाने समाधान न झालेल्या विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातल्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
पंतप्रधानांच्या या निवेदनावर काही स्पष्टीकरण मागण्यासाठी विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी परवानगी मागितली असता त्यांना ही परवानगी नाकारली गेली.संसद सदस्यांच्या मागणीवरुन जर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन सादर केले असेल तर त्यावर सदस्यांना स्पष्टीकरण मागता येऊ शकत नाही असे राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी सांगितले.यावर विरोधी पक्षांना अशाप्रकारे दडपता येऊ शकणार नाही असे जेटली यांनी म्हटले.पंतप्रधानांच्या निवेदनावर स्पष्टीकरण मिळवण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.या सर्व गोंधळामुळे दोन्हीही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
|