
मुंबई- मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान जलदगती मार्गावर महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी रविवारी, २७फेब्रुवारीला सकाळी १०.२२ ते दुपारी ३.३४ या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ठाण्याहून कल्याणकडे जाणा-या जलदगती गाडय़ांची वाहतूक धीम्यामार्गावरून वळवण्यात येईल. तसेच या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील.
रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ च्या दरम्यान हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि वडाळा रोड ते वांद्रे स्थानक दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसटीकडे जाणा-या गाडय़ा सकाळी १०.३९ ते दपारी ३.५३ या वेळात कुर्ला स्थानकातून मेन लाईनवरून वळवण्यात येतील. चिंचपोकळी व करीरोड स्थानकात या गाड्या थांबणार नाहीत. तसेच वांद्रे व अंधेरी येथून सीएसटीकडे जाणा-या व येणा-या गाडय़ा सकाळी १०.४१ ते दुपारी ४.०३ या काळात बंद राहतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत मेन मार्गाने किंवा पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचा जंबो ब्लॉक
रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा तसेच हेड वायरींच्या दुरुस्तीसाठी रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान पश्चिम रेल्वेने सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या काळात दोन्ही धीम्या मार्गावर जंबो ब्लॉक घेतला आहे. या काळात धीम्या गाडय़ांची वाहतूक जलदगती मार्गावर वळवण्यात येईल, तसेच विलेपार्ले स्थानकात फलाट क्रमांक तीन व चार येथे १२ डब्यांच्या गाडय़ा दोनदा थांबवण्यात येतील. काही गाडय़ा रद्दही केल्या आहेत.
|